आपचा E20 विरोधात हल्लाबोल , केजरीवालांनी दिला आंदोलनाचा इशारा

Foto
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता आम आदमी पार्टीने पेट्रोलमधील २० टक्के एथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. सरकारने हे धोरण मागे न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात थेट पंतप्रधान निवासस्थानावर याचिका घेऊन जाण्याची रणनीतीही 'आप'ने आखली आहे.

'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत तरुणाईला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. "देशातील तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवला, त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता E20 इंधनाच्या मुद्द्यावरही आपल्याला अशाच प्रकारे एकजुटीने आवाज उठवावा लागेल," असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

'नॅशनल टाउनहॉल'चे आयोजन
E20 धोरणाविरोधात नागरिकांचे आणि विशेषतः तरुणांचे मत जाणून घेण्यासाठी आम आदमी पार्टीकडून येत्या शनिवारी 'नॅशनल टाउनहॉल अगेंस्ट E20'चे आयोजन करण्यात आले आहे. या टाउनहॉलमध्ये सर्वसामान्यांना आणि वाहनधारकांना थेट सहभागी होऊन E20 इंधनामुळे गाड्यांवर आणि खिशावर होणाऱ्या परिणामांबद्दल आपले मत मांडता येणार आहे. या कार्यक्रमात देशभरातून लोक ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी होऊ शकतात. यासाठी एक मोबाईल नंबर देखील जारी करण्यात आला आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. सर्वांचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकावाच लागेल, असेही केजरीवाल म्हणाले.